Tuesday, 28 August 2018

Wednesday, 8 August 2018

विश्व आदिवासीदिवस

आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी म्हटले की, आपल्यासमोर  डोंगर दर्‍यात राहणारा, जंगलात राहणारा, उघडा, नागडा असणारा, ओबड धोबड चेहर्‍याचा, जगाशी कुठलाही संपर्क नसणारा समाज येतो. जगाच्या पाठीवर ज्या माणसाने, ज्या जिवाने पहिल्यांदा जन्म घेतला तो जीव म्हणजे आदिमानव म्हणजेच आदिवासी. आज जगाच्या पाठीवर ज्या काही कला अस्तित्वात आहेत, त्या सगळ्या कलांचा उद्गाता आदिवासी आहे. आदिवासीयांची लोककला, चित्रकला, नृत्यकला, वादन, गायन, शिल्पकला याला तोड नाही. आदिवासी आजही आपली उपजीविका जंगलात मिळणार्‍या रानमेवाव्यावर करीत आहे.

आजही गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती, ठाणे, किनवट, आदिलाबाद (आंप्र.) या भागात राहणारे आदिवासी बांधव जंगलाच्या जवळच राहणे पसंत करतात. ‘आदिवासी तेथे जंगल, जंगल तेथे आदिवासी’ असल्यामुळे निसर्गातील प्रत्येक वस्तूला ते दैवत मानतात. निसर्गावर त्यांची निस्सीम श्रद्धा आहे. संयुक्त राष्ट्रसंघटना आणि तिची सलग्न संस्था आंतरराष्ट्रीय मजूर संघटनेने आदिवासींना ‘इंडिजिनस’ अर्थात देशज, मूळनिवासी असे संबोधावे अशी शिफारस केली आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनाने जागतिक आदिवासी समुदायाच्या अधिकाराच्या रक्षणार्थ १९९३ हे जागतिक आदिवासी वर्ष घोषित केले होते. तसेच, #९_ऑगस्ट_हा_जागतिक_आदिवासी_दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. आदिवासी हेच पृथ्वीचे मूळनिवासी आहेत आणि ४६१ आदिवासी जमाती भारतात वास्तव्यास आहेत. आदिवासींच्या जातीत आज आणखी काही जाती समाविष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या प्रेरणेने १९९४-२००५ हे ‘आदिवासी दशक’ म्हणून साजरा करण्यात आले.

भारतामध्ये प्रामुख्याने चेंचू इरुला, कदार, कोटा या निग्रो, प्रोटो ऑस्ट्रॉलॉईड या वांशिक जमाती केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात राहतात. मध्य भारतात बिहार, ओरिसा, मध्य प्रदेश, पं. बंगाल या राज्यामध्ये गोंड, संथाल, भूमजी, हो, ओरियन, मुंडा, कोरवा या प्रमुख जाती वास्तव्य करतात. राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, गोवा, दमण-दीव, दादरा, नगर हवेली या राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशात भिल्ल या प्रमुख जमातीचे लोक राहतात. या व्यतिरिक्त कोळी, कोकणा-कोकणी, वारली, ठाकूर, कातकरी, आंध्र परधान, कोलाम, कोरकू, माडिया, गोंड, राज-गोंड या जमाती राहतात. आदिवासी हे हिंदू नाहीत, असा निर्णय न्यायालयाने एका प्रकरणात १९ जानेवारी १९७९ रोजी दिला आहे.

आदिवासींमध्येही अनेक स्वातंत्र्यसैनिक होते होऊन गेले  क्रांतिकारक बाबूराव शेडमाके, नारायणसिंह उईके, राघोजी भांगरे , बख्त बुलंद शहा, दलपतशहा, रघुनाथ शहा, विरांगणा राणी दुर्गावती मडावी, कुमरा भीमा . रावणाचे वंशज आजही आदिवासी म्हणूनच श्रीलंकेत ओळखले जातात अन त्यांना श्रीलंका शासनाकडून तशी वंशज म्हणून रक्कम अदा केली जाते .

#शिवसंस्कृती_फाऊंडेशन
#जागवू_इतिहास_नव्याने

Saturday, 7 July 2018

महेंद्र सिंह धोनी [माही]

तुझे मिलके लगा है ये
तुझे ढूंढ रहा था मैं.....
माही माहीss. . .

हे गाणे भारतीय क्रिकेट 'त्यालाच' उद्देशून म्हणत आलंय असं नाही वाटत?
आज त्याचा हॅपी बर्थडे :)

त्याची आकडेवारी, त्याचं बॅटिंगचं विचित्र तंत्र, त्याचा हेलिकॉप्टर शॉट, त्याने जिंकलेल्या स्पर्धा, त्याचा शांत स्वभाव, त्याने क्रिझमध्ये तसेच स्टंपमागे उभे राहून केलेले अफलातून करिष्मे, त्याची कसोटीमधून तडकाफडकी निवृत्ती, त्याने सोडलेली कॅप्टनसी, या सगळ्यावर.. इतकंच काय पण त्याच्यावर आलेल्या झकास सिनेमावरही बरंच बोलून झालंय. आता तो कॅप्टनही नाही. पण..

पण काही अनोख्या गोष्टींसाठी तो कायमचा मनात कोरला गेलाय. कॅप्टन असताना हाच धोनी गांगुलीला त्याच्या शेवटच्या टेस्टमध्ये शेवटी तासभर ऑनफिल्ड कॅप्टन करतो हे कसं विसरता येईल? सचिन, सौरव, राहुलवर पोसलेल्या आमच्या पिढीला तर तेव्हा तो जामच आवडून गेला होता. बॉलआउट ओव्हर आल्यावर बोलर्स न वापरता ज्यांचा थ्रो बसेल अशा सेहवाग, हरभजन, आणि चक्क उथप्पा यांना वापरणारा धोनी आणि फायनलला पाकचे अंदाज चुकवत जोगिंदरला लास्ट ओव्हर देणारा आउट ऑफ द बॉक्स धोनी कोण विसरेल? किमान चार मल्टीटीम्स टूर्नामेंट्स जिंकणारा इम्रान खान आणि रिकी पॉन्टिंगनंतरचा फक्त तिसरा कॅप्टन ही त्याची ओळख कोण पुसेल? प्रेयसी जगच सोडून गेल्यावर त्यातून बाहेर येत पुढची आठ वर्षे सगळी एनर्जी टीमसाठी लावणारा धोनी कुणाला प्रेरणा देणार नाही?

फक्त नशीब चांगलं म्हणून मिडास टच धोनी, खेळाडू नव्हे तर फक्त इंडिया सिमेंटचा ब्रँड धोनी, श्रीनिवासनचा लाडका धोनी असली शेलकी विशेषणं, टोमणे झेलूनही मर्यादेत राहणारा धोनी कुणाला कळेल? युवराजचे वडील योगराज वाट्टेल ते आरोप करत युवी-माहीच्या मैत्रीत जोर लावून फूट पाडत असताना अपमान सहन करत हिमतीने शांत राहणारा धोनी कसा असेल? याच युवीची मुरलीधरनसमोर उडत आलेली भंबेरी सतत पाहिल्याने स्वत: चौथ्या नंबरवर खेळायला जाऊन 'लीड फ्रॉम फ्रंट' असं असतं हे दाखवत वर्ल्डकप फायनलला प्रथमच पावणेतीनशे चेस शक्य करून दाखवणारा धोनी विलक्षण नव्हता का?

सर्वात महत्त्वाचं म्हणजे जगभरात आजवर झालेल्या ४५३ कॅप्टन्सपैकी आयसीसीच्या तिन्ही मानाच्या ट्रॉफीज जिंकणारा (आतापर्यंतचा) एकमेव कॅप्टन म्हणून धोनी कायमचा मनात कोरला जाईलच ना.. मग आमचं गणित १>४५२ असं का असू नये? कोणतीही स्पर्धा जिंकल्यावर (बहुतेकदा त्यानेच फिनिश केल्यावर) ग्रुप फोटोच्या वेळी मात्र तरुण खेळाडूंना कप हातात देऊन मोठ्या मनाने स्वतः सर्वात कोपऱ्यात उभा राहणारा धोनी लक्षात राहतोच ना? आताशा तर तो अशा फोटोंच्याही पलिकडे गेलाय, कारण या वर्षी दोन वर्षे वनवास भोगून आयपीएलमध्ये पुनरागमन करताच चेन्नईला पुन्हा दिमाखात विजेतेपद मिळवून दिल्यावर ग्रुप फोटोच्या वेळी मात्र त्यावेळीच मागून पळत आलेल्या आपल्या लाडक्या झिवाशी खेळणारा प्रेमळ बाप माहीसुद्धा आपण पाहिला, असाही धोनी कुणाला आपलासा वाटणार नाही?

लव्ह यू महेंद्रसिंग धोनी.. आम्ही सगळे ‘साक्षी’ आहोत तुझ्या कॅप्टन्सीच्या आणि बॅटिंग - किपींगच्या झळाळत्या कारकिर्दीचे.

लवकरच तूही वनडेत दस हजारी मनसबदार हो.. ऑल द बेस्ट!
हॅपी बर्थडे माही वन्स अगेन :)

#Happy_Birthday_Dhoni #HBD_MSD

Saturday, 13 January 2018

पानिपत : पराभावतील एक विजयाची कहाणी...


१४ जानेवारी १७६१:-

मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

“कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!”

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल.जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.

१० जानेवारी १७६० रोजी बुर्‍हाडी घाटावरील लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली. संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात  ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली.त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले.अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली.पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी  काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली. अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली.

घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. “हर हर महादेव” आणि “अल्ला हो आकबर” चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास! या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर – अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्‍यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.

पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील.

पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार.

दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन.

तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी.

चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण

पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.

पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक”मक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले.

पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील अशी मोक्याची किंवा निर्णायक घटना होती की ती जिंकली असती तर मराठी सत्ता एक महासत्ता म्हणून उदयास आली असती याविषयी अधिक युक्तिवाद करण्यापेक्षा “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉन्क्वेस्ट’ या पुस्तकाचे लेखक अर्नाल्ड फ्लेचर यांचे मत उधृत करणे उचित होईल. “”पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते” असे सांगून फ्लेचर पुढे लिहितात, "काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता की, जेणेकरून नंतर ब्रिटिशांचा विजय अशक्य झाला असता."

Thursday, 28 December 2017

शिरीष कुमार मेहता

#शिरिष_कुमार_मेहता
#जन्मदिन_२८_december_१९२६

पाताळगंगा नदीच्या काठी चार डोंगराच्या कुशीत वसलेल्या नंदनगरी अर्थात नंदुरबार शहराची पूर्वापार ओळख ही व्यापाऱ्यांची वसाहत म्हणूनच. या गावात १९२६ मध्ये एका व्यापाऱ्याच्या घरात शिरीषकुमारांचा जन्म झाला.
त्याच्यासह पाच संवगड्यांनी स्वातंत्र्य लढ्यात प्राणाची आहुती दिली. त्यामुळे या गावाचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोचले.

नंदुरबार हे आता कुठे अंदाजे एक लाख लोकसंख्येचे छोटेसे गाव आहे. परस्परांना ओळखणारे आणि स्नेह जाणणारे लोक आहेत. घराघरांतून चालणारा व्यापार आणि देवाणघेवाण हे महत्त्व जाणून पूर्वापार अनेक ज्येष्ठ प्रवाशांनी या गावाला भेटी दिल्या आहेत.

प्रसिद्ध प्रवासी ट्‌वेनियरने १६६० ला श्रीमंत आणि समृद्धनगरी असे नंदुरबारचे वर्णन केले आहे, तर नंद नावाच्या गवळी राजाने हे गाव वसविल्याची आख्यायिका आहे. ऐन-ए-अकबरी (इ.स. १५९०) मध्ये नंदुरबारचा उल्लेख किल्ला असलेले आणि सुबक घरांनी सजलेले शहर असा आहे.

नंदुरबारमध्ये बाळा शंकर इनामदार नावाचे एक व्यापारी होते. त्यांचा तेलाचा व्यापार होता. त्यांना मुलगा नसल्याने ते काहीसे दु:खी होते. त्यांनी पुत्रप्राप्तीसाठी दुसरा विवाह केला. त्यांना कन्याप्राप्ती झाली. ही कन्या त्यांनी पुष्पेंद्र मेहता यांना सोपवली.

१९२४ ला पुष्पेंद्र व सविता यांचा विवाह झाला. २८ डिसेंबर १९२६ ला या दांपत्याच्या पोटी, मेहता घराण्यात शिरीषकुमारचा जन्म झाला. या काळात देशातील अन्य गावे व शहरांप्रमाणेच नंदुरबारचेही वातावरण स्वातंत्र्यलढ्याच्या प्रेरणेने भारलेले होते.

स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सामान्यांनी काय करायचे तर हाती तिरंगा झेंडा घेऊन प्रभातफेरी, मशाल मोर्चे काढायचे. देशप्रेमांनी ओतप्रोत घोषणा द्यायच्या! नंदुरबारमधील अशा कामात मेहता परिवाराचा सहभाग होता.

शिरीष वयपरत्वे शाळेत जाऊ लागला होता आणि त्याच्यावर महात्मा गांधी व नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मोठा प्रभाव होता. त्या काळात "वंदे मातरम्‌' आणि "भारत माता की जय' असा जयघोष करणाऱ्या कोणालाही पोलिस अटक करू शकत होते.

                    नहीं नमशे, नहीं नमशे!

महात्मा गांधींनी ९ ऑगस्ट १९४२ ला इंग्रजांना "चले जाव'चा आदेश दिला. त्यानंतर गावोगावी प्रभात फेऱ्या, ब्रिटिशांना इशारे दिले जाऊ लागले. बरोबर महिनाभरानंतर, ९ सप्टेंबर १९४२ ला नंदुरबारमध्ये निघालेल्या प्रभात फेरीत आठवीत शिकत असलेला शिरीष सहभागी झाला होता.

गुजराथी मातृभाषा असलेल्या शिरीषने प्रभात फेरीत घोषणा सुरू केल्या, "नहीं नमशे, नहीं नमशे', "निशाण भूमी भारतनु'. भारत मातेचा जयघोष करीत ही फेरी गावातून फिरत होती.
मध्यवर्ती ठिकाणी ती फेरी पोलिसांनी अडवली.

शिरीषकुमारच्या हातात झेंडा होता. पोलिसांनी ही मिरवणूक विसर्जित करण्याचे आवाहन केले. या बालकांनी ते आवाहन झुगारले आणि "भारत माता की जय', "वंदे मातरम्‌'चा जयघोष सुरूच ठेवला.

अखेर पोलिसांनी गोळीबार सुरू केला. एका पोलिस अधिकाऱ्याने मिरवणुकीत सहभागी मुलींच्या दिशेने बंदूक रोखली.

#तेव्हा_त्या_अधिकाऱ्याला_एका_चुणचुणीत_मुलाने_सुनावले_गोळी_मारायची_तर_मला_मार....

ती वीरश्री संचारलेला मुलगा होता, शिरीषकुमार मेहता! संतापलेल्या पोलिस अधिकाऱ्याच्या बंदुकीतून सुटलेल्या, एक, दोन, तीन गोळ्या शिरीषच्या छातीत बसल्या आणि तो जागीच कोसळला.

त्याच्यासोबत पोलिसांच्या गोळीबारात लालदास शहा, धनसुखलाल वाणी, शशिधर केतकर, घनश्‍यामदास शहा हे अन्य चौघेही शहीद झाले.

"शिरीषकुमार मेहता" या मराठी बालक्रांतीकारकाला सबंध महाराष्ट्राचा मानाचा मुजरा !!!!!

  

Monday, 25 December 2017

मराठे आणि रणांगण

किटींग हा इंग्रज अधिकारी म्हणतो - मराठे रणांगणावर मेलेल्या आपल्या लोकांची प्रेते उचलून नेत असत .

तर फॉर्बेस याचे असे निरीक्षण आहे की - पुष्कळशा मराठ्यांना रणांगणावर मेलेल्या किंवा जखमी झालेल्या आपल्या सैनिकांना हलवण्यास जमत नसे . परंतु माणुसकीच्या दृष्टीने ते याबाबतीत खूपच जागरूक असत .
ते क्वचितच प्रेत युद्ध भुमीवर सोडून देत असत .
आपल्या सहकार्याला मराठे मेल्यावरही एकटे सोडत नसत अशी भावना बाकी राज्यकर्त्यांच्या सैन्यामध्ये कधीही दिसून आली नाही.

Saturday, 21 October 2017

हंबीरराव मोहिते

हंबीरराव मोहिते यांचे मूळ नाव हंसाजी मोहिते.  नेसरीच्या लढाईत प्रतापराव यांच्या मृत्युमुळे मराठा सैन्य बिथरले गेले.

मराठा सैन्य बहलोलखानाकडून पराभव होण्याच्या बेतात असताना ऐन वेळी हंसाजी मोहिते यांनी आपल्या ताज्या दमाच्या सैन्यासह बहलोल खानाच्या सैन्यावर धाड घालून पराभवाचे रुपांतर विजयात केले. या पराक्रमासाठी हंसाजी मोहिते यांना महाराजांनी 'हंबीरराव' हा किताब दिला.

18 एप्रिल 1674 रोजी चिपळूण येथे महाराजांनी आपल्या सैन्याची पाहणी केली त्यावेळी हंबीररावांना सरनौबत (मुख्य सेनापती) केले.

जानेवारी 1677 मध्ये हंबीररावांनी गदग प्रांतावर स्वारी करून कोप्पळ जिल्ह्याचा मुख्य अधिकारी विजापुरी सरदार हुसेनखान मियाना यांचा येलबुर्ग्याजवळ पराभव केला.
*महाराजांनी भागानगर (हैद्राबाद) भेटीवेळी सोबत *1677 व्यंकोजींचा अहिरी येथे पराभव * नोव्हेंबर 1679 जालना येथे मोघलांच्या लढाईत जखमी *शिवरायांची पत्नी सोयराबाई साहेब यांचे भाऊ सरसेनापती हंबीररावांना मानाचा मुजरा ....

महाराजांनी हंबीररावांना "हंबीरराव"हा किताब बहलोलखानाच्या लढाईत न देता अफजलखानाच्या लढाईत दिला आहे. हंबीररावांनी त्या युद्धात 6तासात 600 शत्रु मारले.असा विक्रम पुर्वी कुणीही गाजविला नाही.महाराजांनी हंसाजी मोहिते यांना हंबीरराव हा मानाचा किताब बहाल केला...,,,

जय शिवराय