Saturday, 13 January 2018

पानिपत : पराभावतील एक विजयाची कहाणी...


१४ जानेवारी १७६१:-

मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी. त्या दिवशी तिथी होती पौष शु. अष्टमी. पानिपतचा भयंकर, प्राणघातकी संग्राम याच दिवशी झाला होता. गोविंद्रग्रजांच्या शब्दात सांगायचे तर,

“कौरव पांडव संगर तांडव द्वापरकाली होय अती,
तसे मराठे गिलचे साचे कलीत लढले पानिपती !!”

पानिपतच्या लढाईचे समर्पक वर्णन करायचे झाले तर ‘यशाचे अपयशात रूपांतर’ असे करता येईल.जानेवारी-१७५७ मध्ये भारतीय अफगाणी सरदार नजीब उद्दौलाच्या निमंत्रणावरून अफगाण राजा अहमदशहा अब्दालीने भारताची मोहीम हाती घेतली. त्याचा उपकर्ता नादीरशहाच्या मृत्यूनंतर त्याने सत्ता बळकावली होती. नादीरशहाबरोबर तो त्यापूर्वी भारतात आला होता. दिल्लीपर्यंत मजल मारून बारा करोड रुपयांची लूट घेऊन तो एप्रिल-१७५७ मध्ये स्वदेशी परतला. दरम्यान, राघोबादादा पेशव्यांनी जंगी फौजेसह नोव्हेंबर-१७५६ मध्ये उत्तरेकडे कूच केले. ऑगस्ट-१७५७ मध्ये दिल्लीला पोहोचेपर्यंत अब्दाली परतला होता. दिल्लीची सल्तनत पुनश्च स्थिरस्थावर करून त्यांनी १७५८ मध्ये अटकेपर्यंत भरारी मारली. त्यात नजीब उद्दौला त्यांच्या हातात सापडला, परंतु मल्हारराव होळकरांनी आपल्या या मानसपुत्राला जीवदान देण्याची गळ घालून नजीबला सोडणे भाग पाडले. ही घोडचूक ठरली.

१० जानेवारी १७६० रोजी बुर्‍हाडी घाटावरील लढाईत पेशव्यांचा अग्रणी सरदार आणि उत्तर हिंदुस्थानातील प्रतिनिधी दत्ताजी शिंदे ठार झाला. अब्दालीचा बंदोबस्त करण्यासाठी मोठी फौज धाडण्याचा निर्णय नानासाहेब पेशव्यांनी घेतला. त्यानुसार त्यांचे चुलतबंधू सदाशिवराव भाऊसाहेब पेशव्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ साठ-सत्तर हजारांची फौज मार्चमध्ये उत्तरेकडे रवाना झाली. त्यात वाटेत मिळालेल्या शिंदे, होळकर यांच्या तुकडय़ाही होत्या. फौजेत चाळीस हजाराचे घोडदळ आणि इब्राहिम गार्दी या धुरंधर तोफचीच्या नेतृत्वाखाली आधुनिक २०० फ्रेंच तोफांचा तोफखाना होता. फौजेबरोबर लाख-दीड लाख बुणगे आणि चाळीस-पन्नास हजार यात्रेकरू होते. इतक्या मोठय़ा फौजेच्या दिमतीसाठी काही हजार बुणग्यांची निश्चित आवश्यकता होती; परंतु दीड लाखांची संख्या मर्यादेबाहेर होती. यात्रेकरूंचा लवाजमा तर नाहक होता. ही दोन्ही लोढणी मराठा सैन्याला प्राणघातक ठरली. संथ चालीने ऑगस्ट-१७६० मध्ये मराठा सेना दिल्लीत पोहोचली. पंजाब-सिंधमधील चौथाई रक्कम अब्दालीने हडप केल्यामुळे भाऊंना पैशाची चणचण भासली. दिल्ली आणि आसपासचा मुलूख लुटण्याची परवानगी देण्याशिवाय त्यांना पर्याय राहिला नाही. शीख आणि जाट सरदारांना हे रुचले नाही. त्यामुळे त्यांच्या तुकडय़ा मराठा सेनेत सामील झाल्या नाहीत. बुणगे आणि यात्रेकरूंना आश्रय देण्याची तयारी मराठय़ांचा सहयोगी सरदार सूरजमलने दाखविली होती; परंतु भाऊंनी त्याला नकार दिला. या दोन्ही घटनांचे दूरगामी परिणाम मराठय़ांना भोगावे लागले.

भाऊंनी सप्टेंबर-१७६० मध्ये पानिपतच्या दिशेने कूच केले. तिथे पोहोचल्यावर पश्चिमेस शहराभोवतीचा खंदक आणि पूर्वेस यमुना नदी यांच्या दरम्यान संरक्षक फळी उभी केली. १७ ऑक्टोबर रोजी पानिपतच्या उत्तरेला कुंजपुरा येथील अब्दालीच्या सैन्याच्या तुकडीवर मराठा सरदार विंचूरकरांनी यशस्वी हल्ला चढविला आणि कुंजपुरा काबीज केला. त्यावेळी पकडलेले एक हजार अफगाण सैनिक मात्र त्यांनी आपल्या शिबिरात  ठेवून घेतले आणि त्यांचा युद्धात आपल्या बाजूने वापर करण्याचा आत्मघातकी निर्णय घेतला. त्यानंतर अब्दालीने मराठय़ांच्या दक्षिणेस आपली मोर्चाबंदी केली.त्यामुळे मराठय़ांचे दक्षिणेकडून येणारे रसदमार्ग खुंटले.अब्दालीच्या सैन्याला मात्र अफगाण रोहिल्यांच्या दोआब (अंतर्वेदी) प्रदेशातून रसद मिळत राहिली. दिल्लीच्या बाजूने प्रचंड रक्कम घेऊन येणाऱ्या मराठय़ांचे उत्तरेकडील मामलतदार गोविंदपंत बुंदेल्यांची पाळत ठेवून हत्या करण्यात आली.पानिपतच्या तिसऱ्या लढाईच्या पराजयाचे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लढणाऱ्या सैनिकांची अक्षमता नव्हे, तर रसदीची वाण!

दोन्ही बाजूंचे सेनाबळ बऱ्याच प्रमाणात समसमान होते. दोन्ही सेनांचे घोडदळ ४०,०००च्या घरात. दुराणी पायदळात काहीसे सरस. मराठय़ांच्या ३०-३५ हजारांसमोर अफगाणी ५०-५५ हजार, तर मराठय़ांचा तोफखाना संख्येत आणि बनावटीत दुराण्यांपेक्षा उजवा. ती कमतरता भरून काढण्यासाठी अब्दालीने उंटावरील हलक्या आणि फिरत्या अशा १००० तोफांची योजना केली होती. या तोफा कमालीच्या प्रभावी ठरल्या. मराठा सैन्याच्या सेनापतींमध्ये रणनीतीबाबत मतभेद होते. इब्राहिम गार्दीचे मत गोलाईच्या लढाई बाजूने होते. गोलाईची लढाई म्हणजे सर्व फळ्या शाबूत ठेवून प्रथम शत्रूसैन्याला बलवत्तर तोफखान्याने भाजून काढायचे. शिंदे-होळकरांच्या मते गनिमी  काव्याला कौल होता; परंतु भाऊंनी गार्दीची सूचना स्वीकारली. अखेरीस कोंडीला आणि उपासमारीस कंटाळून १४ जानेवारीला भाऊंनी अब्दालीच्या सैन्यावर हल्ला चढविण्याचा निर्णय घेतला. सर्व संकटे आणि ओढाताणीला न जुमानता मराठय़ांनी अहमहमिकेने आणि निकराने सकाळीच लढाईला सुरुवात केली.

घोड्याला घोडी व माणसाला माणसे भिडली. “हर हर महादेव” आणि “अल्ला हो आकबर” चा घोष होऊ लागला. रणमैदान पेटू लागले. गोविंदपंत बुंदेल्यांना ठार मारणारा अन् मराठ्यांची रसद मारणारा अताईखान यशवंतराव पवारांनी फाडून काढला. विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यात पडू लागलेली होती. बारा-एक वाजेपर्यंत मराठय़ांची सरशी स्पष्ट दिसत होती. पण दैव फिरले. दुपारी १ वाजता सुर्याचे दक्षिणायन सुरू झाले. मराठी लष्कराची तोंडे देखील दक्षिण बाजूला. आधी महिनाभराचा कडकडीत उपास, त्यात वर तिरप्या सूर्यकिरणांचा मारा. पाण्याची कमतरता. त्यामूळे लढता लढता निव्वळ डोळ्यावर अंधारी येऊन उपाशी जनावरे व माणसे कोसळू लागली. इब्राहिम गार्दीच्या तोफांनी पाडलेले खिंडार पाहून हल्ला करण्यास अधीर झालेले विंचूरकर आणि गायकवाड या दोघांनी इब्राहिमच्या आर्जवांना भीक न घालता अवेळी चढाई केली. बिनबंदुकीचे घोडेस्वार पाहून माघारी जाणाऱ्या रोहिल्यांनी त्यांच्यावर गोळ्यांचा वर्षांव केला आणि मराठी तुकडय़ा परत फिरल्या. भाऊ आणि विश्वासराव आपल्या हत्तीवरून खाली उतरून लढू लागले आणि ठार झाले. मोकळ्या अंबाऱ्या पाहून मराठा सैन्याचा धीर खचला आणि ते सैरावैरा धावू लागले. हीच संधी साधून अब्दालीने आपले ताजेतवाने राखीव सैन्य पुढे केले आणि पळणाऱ्या मराठी सैन्यावर प्राणघाती हल्ला चढवला. याचवेळी विंचूरकरांच्या शिबिरात ठेवलेल्या अफगाणांनीही उठाव केला. दुसरा कोणता पर्याय नसल्याचे पाहून होळकर आणि शिंद्यांच्या तुकडय़ांनी सापडलेल्या फटींमधून दक्षिणेकडे कूच केले.

सूर्यास्तापर्यंत मराठा सैन्याचा दारुण पराभव झाला. बाकी होती ती गिलच्यांकडून मराठी बंदी सेनेची, बुणग्यांची आणि यात्रेकरूंची निर्घृण कत्तल! तो एक केवळ काळा इतिहास! या युद्धात मराठ्यांची एक सबंध पिढीच्या पिढी कापली गेली. सदाशिवराव भाऊ, विश्वासराव पेशवे, जानकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, संताजी वाघ, इब्राहिमखान गारदी, समशेर बहाद्दर – अवघे मारले गेले. महाराष्ट्रातील प्रत्येक उंबर्‍यातील कमीत कमी एक जण तरी या लढाईत कामी आलेला आहे.

पानिपतच्या लढाईत पाच मोक्याची वळणे नमूद करता येतील.

पहिले- गरजेपेक्षा अधिक बुणगे आणि यात्रेकरू फौजेबरोबर पाठविण्याचा निर्णय आणि सूरजमलच्या प्रस्तावाला भाऊंचा नकार.

दुसरे- अब्दालीचे यमुना उल्लंघन.

तिसरे- नोव्हेंबरमध्येच अब्दालीवर हल्ला चढविण्याची गमावलेली संधी.

चौथे- एकाच ठिकाणी प्रहार करून भगदाड पाडण्याऐवजी सैन्याची पसरण

पाचवे- राखीव दलाचा अब्दालीकडून वापर आणि त्याबाबतीत मराठय़ांची त्रुटी.

पानिपतचे युद्ध मराठे हरले असले तरी त्यांनी अब्दालीचा ज्या प्रकारे प्रतिकार केला त्यातून धडा घेऊन अब्दाली किंवा वायव्येकडील एकही आक”मक त्यानंतर भारतावर हल्ला करू शकला नाही. हा मराठ्यांमुळे झालेला भारताचा एक महत्त्वाचा लाभ होय. दुसरे असे की पानिपतच्या रणभूमीवर एवढा जबरदस्त मार खाऊनदेखील मराठे परत उभे राहिले.

पानिपतची लढाई म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील अशी मोक्याची किंवा निर्णायक घटना होती की ती जिंकली असती तर मराठी सत्ता एक महासत्ता म्हणून उदयास आली असती याविषयी अधिक युक्तिवाद करण्यापेक्षा “अफगाणिस्तान हायवे ऑफ कॉन्क्वेस्ट’ या पुस्तकाचे लेखक अर्नाल्ड फ्लेचर यांचे मत उधृत करणे उचित होईल. “”पानिपतचे युद्ध हे इतिहासाला कलाटणी देणारे निर्णायक युद्ध होते” असे सांगून फ्लेचर पुढे लिहितात, "काही इतिहासकारांच्या मते हे युद्ध मराठ्यांनी जिंकले असते, तर त्यांनी हिंदुस्थानावर असा एकछत्री अंमल प्रस्थापित केला असता की, जेणेकरून नंतर ब्रिटिशांचा विजय अशक्य झाला असता."